User talk:Sachin Susheel

From Meta, a Wikimedia project coordination wiki

मरिना अब्रामोविक[edit]

जागतिक मॉडेलिंग आणि पेरफॉरमिंग आर्टस् क्षेत्रातील जगप्रसिद्ध नाव. मूळची यूगोस्लोवकिया नागरिकत्व असलेली ही मॉडेल तिच्या विविध पेरफॉरमिंग एक्सपरिमेंट्स अँड रिसर्च साठी जगविख्यात आहे. तिला 'मदर ऑफ परफॉर्म' म्हटले जाते. तिच्या 'रॅशनल बिहेवीअर' अँड 'रॅशनल बॉडी लँग्वेज' या एक्सपरिमेंटल मधील अनेक परफॉर्मन्स पैकी सर्वात पहिला 'रिदम 0' हा परफॉर्मन्स अतिशय जगप्रसिद्ध आहे. १९७४ मध्ये इटली येथे तिने पहिला परफॉर्मन्स दिला. त्यात तिने सुमारे सहा तासासाठी उपस्थित असलेल्या लोकांपुढे 'ऑब्जेक्ट' (वस्तू) म्हणून स्तब्ध उभे राहून लोकांना आपल्या बरोबर पाहिजे ते करण्याची मुभा दिली आणि सोबतच त्या परफॉर्मन्स मध्ये जे काही घडेल याची जवाबदारी तिने स्वतःवर घेतली. दरम्यान तिने एका टेबलावर ७२ वस्तू ठेवल्या ज्यात गुलाबाची फुले,परफुम्स,चॉकलेट्स,साखळी,ब्लेडस,काटेरी झुडूप,पिस्तुल अश्या वस्तूंचा समावेश होता. रात्री आठ वाजता तिने उभी राहून पोझिशन घेतली. सुरवातीला तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी काही फोटोग्राफर्स पुढे आले त्यांनी फोटो काढण्यास सुरवात केली. त्यानंतर हळू हळू इतर लोक पुढे येऊन तिला स्पर्श करू लागले,तिच्या शरीराशी खेळू लागले,तिच्या अंगावरील कपडे काढून तिला नग्न केले,काहींनी तिच्या स्तनांना आणि इतर ठिकाणी हाताने,तोंडाने स्पर्श केले.काहींनी तिला नंतर एका जागेतून दुसऱ्या जागी हलवले,तिला साखळीने बांधले,तिच्या अंगावर काटे बोचले,ब्लेडने गळ्यावर कापले तसेच तेथील उपस्थित एका व्यक्तीने तिच्या हातात पिस्तुल देऊन तिच्यावरच धरायला लावले. सुमारे सहा तास चाललेला हा परफॉर्मन्स अखेरीस रात्री दोन वाजता संपला आणि वेदनामयी अंगाने आणि अश्रूभरलेल्या डोळ्यांनी मरिनाने हॉल मध्ये चालायला सुरुवात केली. ती तेथील प्रत्येक व्यक्तीसमोर उभी राहिली ज्याने तिच्या सोबत शक्य तितके अनुभव घेतले.अखेरीस ती त्या व्यक्तीसमोर उभी राहिली जिने तिच्या मानेवर ब्लेडने चिरले आणि तिच्या हातात पिस्तुल देऊन तिच्यावर धरण्यास प्रवृत्त केले.परंतु त्यावेळी तो व्यक्ती तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नव्हता.त्याला त्याच्या कृत्याबद्दल अतिशय लाज वाटली आणि तो रडू लागला. वरील परफॉर्मन्स मध्ये मरिनाने लोकांसमोर हे मांडले की, असह्य-दुबळ्या व्यक्तींना शक्य तितका त्रास देण्यास इतर लोकांना अतिशय आनंद होतो. त्यावेळी ते एखाद्याच्या जीवाशी खेळतात. त्यामुळे जातीय दंगे, मारामाऱ्या,भांडण यामध्ये लोक असाह्य व्यक्तींना वेदना पोहचवतातया एक्सपरिमेन्ट ने तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना त्यांच्यातील गुन्हेगार वृत्तीची जाणीव करून दिली. तिच्या अनेक परफॉर्मन्स पैकी वरील परफॉर्मन्स अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्याद्वारे मानसशास्त्रीय उपचारात या थेअरीचा वापर केला जातो. या परफॉर्मन्स बद्दल अनेक विडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत तसेच मरिनाची संक्षिप्त माहिती विकिपीडिया वर उपलब्ध आहे.

बाबूराव रामचंद्र बागूल[edit]

(जुलै १७, १९३० - मार्च २६, २००८)

लेखक बाबुराव बागुल हे दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही दलित कथांचे प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, कष्टकऱ्यांच्या जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारूण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कँपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठ्यांच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.

१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ’जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ’जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ’मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली.

हिरा गुलाबराव बनसोडे[edit]

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे या खेड़ेगावी माझा जन्म झाला. वडील म्युन्सिपार्टित मेंशन म्हणून काम करायचे. शिक्षणही म्युन्सिपार्टीच्या शाळेत झाले. माझ्या जन्माच्या वेळेस घरी साखर वाटली नाही की नावाच्या घुगरया वाटल्या की नाही हे मला माहीत नाही कारण मी मुलगी झाली हे वडलांना कळवल तेव्हा त्यांनी पत्रच फाडून टाकली.तिथुनच स्त्रीच्या बाईपनाची वेदना वाट्याला आली.नववित असताना लग्न झाले आणि संसाराचा गाडा माझ्या कोवळया खांद्यांवर पडला.शिकायला परवानगी नव्हती पण काट्यांसोबत फुलही फुलतात त्याप्रमाणे पुढे माझ्या सासऱ्यांनी व् यजमानांनी मला शिक्षणास परवानगी दिली. प्राइवेट क्लास जॉइन करुन मी १९६२ ला 'एस एस सी' पास झाले. १९६५ साली मला रेल्वेत नोकरी लागली. रेल्वेत असतानाच मी कविता करू लागले.लहानपना पासूनच गायची आवड होती. आणि मग कंठात गाणे आणि लेखनित कविता अशी माझी आणि कवितेची गळाभेट झाली.माझ्या श्वासात कविता कायम रुतून राहिली.कविता माझ्यात कधी विरघळली हे कळलच नाही.त्यानंतर माझ्या कविता मासिकांतून, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होवू लागल्या. आकाशवाणी,दूरदर्शन आणि इतर काव्यसंमेलनात माझ्या कवितेचा सहभाग असायचा. माझ्या 'फिर्याद' या कविता संग्रहाचा मराठवाड़ा विद्यापीठातील बी ऐ च्या अभ्यासक्रमात सहभाग झाला.या वर्षापासून 'फिर्याद' कविता संग्रह एम् ऐ च्या अभ्यासक्रमात् आहे. माझा पहिला काव्यसंग्रह 'पोर्णिमा' १९६९ साली प्रसिद्ध झाला. त्यात प्रेम,निसर्ग,वर्णन होती.पोर्णिमेची चांदण पानापानात झिरपायची.काव्यफुलांचा बहार असायचा.ती नजाकत अलगच असायची...मी त्यात रमून जायची. पण समाजात दलित स्त्रियांवर होणारे अत्याचार,त्यांची विटम्बना,सवर्णानि केलेले बलात्कार,त्यांच्या त्या करुण किंकाळ्यांनी काळजाला आग लागली होती.आणि माझ्या कवितेने कुस बदलली.आता माझी कविता वयात आली होती.माझी कविता वयात आली होती. त्यातूनच माझा 'फिर्याद' काव्यसंग्रह जन्मास आला त्यात मी स्त्रियांच्या व्यथा,वेदना,तरफड आणि जखमा समाजापुढे मांडल्या. त्यातल्या कविता स्त्रियांना आपल्या वाटल्या.'फिर्याद' हा काव्यसंग्रह खुप गाजला. त्यातील कवितांचे हिंदी,इंग्रजी,उर्दू,कन्नड़,गुजराती भाषेत भाषांतर झाली. आत्तापर्यंत माझे 'पोर्णिमा','फिर्याद' आणि 'फिनिक्स' असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आणि वाचकांच्या पसंतीस मनमुराद उतरले आहेत. लवकरच 'फ़क्त तुझ्यासाठी' हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

- 'फीनिक्स' ला महाराष्ट्र राज्याचा 'कुसुमाग्रज' पुरस्कार (२००१-२००२) - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन,कैनेडा पुरस्कार (२००२) - अस्मितादर्शन चा 'अहिल्याबाई होळकर' पुरस्कार - दया पवार पुरस्कार (२००८-२००९) - कर्मवीर दादासाहेब पुरस्कार (२००२) - संबोधि प्रतिष्ठान पुरस्कार (२००८) आणि इतर अनेक महत्वाचे पुरस्कार.

माझ्या रेल्वेच्या सेवेत मी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि कविसंमेलनात भाग घेत असे. विशेष महत्वाचे म्हणजे त्या काळात आयु.सुशील पगारे (चांदोरीकर) हे 'रेलप्रभा' साहित्य मंडळामार्फ़त 'रेलप्रभा' हे मासिक काढयचे त्यात ओढिने आणि आत्मियतेने माझ्या कवितेचा सहभाग असायचा... अजूनही हे एकमेव साहित्यिक मासिक सुरु आहे रेल्वेत.त्यांनी या मासिकासाठी फार कष्ट घेतले. त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो.

परंतू,रेल्वेने आमच्या सारख्या सहित्यिकांना कधीच खेळाडूंसारखी वागणूक आणि प्रोत्साहन दिले नाही याची खंत वाटते कायमच ! माझ्या साहित्यिक प्रवासात माझ्या पतींनी मला नेहमीच सहाय्य केले माझ्या कवितेचे सर्व श्रेय त्यांचेच आहे. जीवाच्या कळा जीवालाच कळतात आणि तेच माझ्या जीवलगांनी माझ्यासाठी केले.

चंद्रवदन चीमनलाल मेहता[edit]

(६ एप्रिल १९०१–१९९२).

प्रख्यात गुजराती नट, नाटककार तसेच कवी, निबंधकार आणि समीक्षक.

जन्म सुरत येथे. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए. झाले.काही काळ नवजीवनचे संपादकही होते. १९३८ ते ५४ ह्या काळात ते ‘आकाशवाणी’वर नोकरीस होते आणि अहमदाबाद केंद्राचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. १९६७ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’देऊन गौरविले. १९७२ मध्ये त्यांना नाट्यलेखनासाठी संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाट्य परिषदांना ते तज्ञ प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात तसेच अहमदाबाद येथील गांधी विद्यापीठात नाट्यविद्येचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून ते काम करत होते.

चंद्रवदन मेहतांचे वडील बडोद्यास रेल्वेमध्ये नाकरीस असल्याने त्यांचा रेल्वेशी व तेथे काम करणाऱ्या माणसांशी प्रदीर्घ काळ व जवळून संबंध आला. यातूनच त्यांचे सर्वोत्कृष्ठ शोकात्म नाटक 'आगगाडी' (१९३७) उतरले. रेल्वेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाची त्यांना असलेली इत्यंभूत माहिती व त्यांच्याशी असलेले सहानुभूतिपूर्ण जवळिकीचे संबंध यांचे पुरेपूर प्रत्यंतर या नाटकांतून येते.

मेहता १९२५ च्या सुमारास मुंबईत शिकत असताना नाटकांची खूपच चलती होती; तथापि नाटकांतील स्त्रियांच्या भूमिका पुरुष करायचे. चंद्रवदन मेहतांनी गुजराती रंगभूमीला दिलेली अतिशय मोलाची देणगी म्हणजे त्यांनी त्याकाळी सर्वांत आधी नाटकातील स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पायंडा पाडला. मेहता केवळ चांगले नाटककारच नव्हते, तर ते अभिनयकुशल श्रेष्ठ नटही होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांत त्यांनी स्वतः उत्कृष्ट भूमिका केल्या आणि त्या आजही अनेकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. त्यांच्या नाटकांत आशयाचे नावीन्य, जिवंत व चमकदार संवाद व विनोद हे गुणविशेष प्रकर्षाने आढळतात. त्यांनी कविता, निबंध, आत्मचरित्रपर लेखन, समीक्षा इ. प्रकारांत विपुल लेखन केले असले, तरी गुजराती साहित्यात ते एक श्रेष्ठ नाटककार व आत्मचरित्रपर लेखनाचे उत्कृष्ट गद्यशैलीकार म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहेत. नाटक व रंगभूमी हे गेली अनेक वर्षे त्यांच्या मोठ्या आस्थेचे व भावबंधाशी निगडीत असलेले विषय राहिले आहेत. लोकांमध्ये चांगली नाट्यभिरूची निर्माण व्हावी म्हणून तसेच आपल्या सुरत विभागात खरीखुरी दर्जेदार रंगभूमी प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.

त्यांची अतिशय गाजलेली नाटके अशी : 'नागाबाबा' (१९३०),'आगगाडी' (१९३७), 'हो-होलिका', 'प्रे मनुं मोती अने बीजां नाटको' (१९३७), 'संताकुकडी' (१९३७), 'धारा सका नर्मद' (१९३७), 'मूंगी स्त्री' (१९३७), 'धरा गुर्जरी' (१९४४),'पांजरापोळ' (१९४७), 'रंगभंडार अने बीजा नाटको' (१९५३),इत्यादी. त्यांनी श्रेष्ठ गुजराती कवी अखो भगत व नर्मद यांच्या रंगभूमीची सुरुवात करून ती गुजराती जनतेपर्यंत नेऊन पोहोचविली. त्यांची नाटके सामाजिक, ऐतिहासिक,पौराणिक, चारित्रात्मक, प्रहसनात्मक इ. प्रकारांत आहेत. चंद्रवदन मेहता आणि के. एम्. मुनशी यांनी त्याकाळी मृतप्राय झालेल्या व्यावसायिक व पारंपरिक रंगभूमाला शेवटचा धक्का देऊन तिला कायमची मूठमाती दिली आणि नव्या आधुनिक रंगभूमीचे गुजरातीत प्रवर्तन केले. मेहतांनी काही गाजलेल्या यूरोपियन नाटकांचे गुजरातीत अनुवादही केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कवितांचा 'इलाकाव्यो' (१९३३) हा संग्रह असून त्यात त्यांच्या स्कुट कविता आहेत, तर 'रतन' (तिसरी आवृ.१९३९) हे त्यांचे दीर्घकाव्य आहे. यातील अनेक कवितांत बहिण-भावातील निरागस, विशुद्ध प्रेम हा विषय आलेला असून ह्या कवितांना त्यांचा असा खास गोडवाही आहे. 'यमल' (१९२६) मध्ये त्यांनी पृथ्वी वृत्तात रचलेली १४ सुनीते असून ती अतिशय सुंदर उतरली आहेत.

मेहतांची नाटकाइतकीच महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनाचे तीन खंड होत. 'बांध गठरियां', 'छोड गठरियां', 'रंगगठरियां' (३ भागांत १९५४). 'नाट्यगठरियां' (१९७०) हा त्यांचा दर्जेदार समीक्षापर ग्रंथ. ह्या खंडांमध्ये त्यांच्या प्रसन्न, स्वतंत्र व उत्कृष्ट अशा गद्यशैलीचे दर्शन घडते. ह्या गद्यलेखनातील त्यांची खास व स्वतंत्र शैली वाचकांस नेहमीच आकृष्ट करत आली आहे. गुजराती गद्याचे एक असामान्य शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान फार वरचे आहे. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत; तथापि त्यात ते यशस्वी झाले नाहीत. वयाच्या ८५ व्या वर्षीही ते अतिशय कार्यक्षम आहेत. एक प्रसन्न व पट्टीचे वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या मौलिक साहित्यसेवेचा गौरव गुजराती रसिकांनी त्यांना १९७८ मध्ये ‘गुजराती साहित्य परिषदे’ चे अध्यक्ष म्हणून निवडून देऊन केला. १९७१ मध्ये त्यांच्यानाट्यगठरियांस साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. १९३६ मध्ये गुजरातीतील सर्वोच्च असा ‘रणजितराम सुवर्णचंद्रक’ ही त्यांना मिळाला.

  1. माहिती #सौजन्य : Copyright © 2015. सर्व हक्क मराठी विश्वकोश कार्यालयाकडे राखीव.